निसर्गदत्तसमाधी.इन वेबसाईट च्या निमित्ताने थोडेसे. . .
आत्मरंगात डुंबून गेलेला जीवनमुक्त निरीच्छ साधू एखाद्या निर्जन गुहेत किंवा डोंगराच्या कड्याकपारीत आयुष्यभर आपल्या आत्मसुखात मग्न राहणे पसंत करतो. लोकसंपर्कापासून दूर राहणे त्याला आवडते. आत्मज्ञान प्राप्तीनंतरचे महाराजांचे जीवन रूढार्थाने जरी गिरगावातील दाटीवाटीने गजबजलेल्या वनमाळी भुवन या वास्तूत होते, तरी त्यांची राहणी मात्र कायम जीवनमुक्त साधुसारखी होती. सदा आत्मानुसंधानात ते डुंबलेले होते. लोकसंपर्कापासून ते स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवत होते. आपल्या १५ x १० च्या पोटमाळ्यावर ते अखेरपर्यंत राहिले. अर्थात सूर्यभास्कराचा तेजस्वी प्रकाश जसा कधी लपून राहू शकत नाही तसा या ज्ञानभास्कराचा प्रकाश लपू शकला नाही. सद्गुरूभेटीचे भाग्य घेऊन जन्मास आलेली जी मंडळी होती ती त्यांच्या भोवताली जमू लागली. त्यांच्या भक्तिप्रेमाने करुणामय महाराजांनी १९५१ सालापासून सद्गुरूपद स्विकारले आणि ते इंचगिरी संप्रदाय परंपरेप्रमाणे सद्गुरूइच्छा प्रमाण मानून नामदीक्षा देऊ लागले. हळू हळू शिष्यपरिवार वाढू लागला. तरी पण त्या पोटमाळयालाच त्यांनी आपली ‘गुहा’ करून टाकली. शिष्यपरिवार मर्यादित होता. फार काय वनमाळी भुवनातील बहुसंख्य रहिवाश्यांना देखील या ‘गुहे’चा बरीच वर्षे पत्ता लागला नव्हता म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
भारतानंद मॉरिस फ्रीडमन यांनी महाराजांच्या चर्चेवर आधारित संपादित केलेला ग्रंथ I AM THAT भारतात आणि भारताबाहेरील अनेक देशात प्रकाशित झाला आणि त्या छोटेखानी गुहेत साधकांची, विद्वजनांची प्रचंड गर्दी होऊ लागली. कामाचा आवाका लक्षात घेऊन लवकरच अध्यात्म केंद्र उभारण्यात आले. दिनांक ८ सप्टेंबर १९८१ रोजी हा ज्ञानभास्कर पश्चिम क्षितिजावर मावळला. दि.९ सप्टेंबर रोजी सकाळी महायात्रा बाणगंगेच्या दिशेने निघाली त्यावेळी वनमाळी भुवन रहिवाश्यांसकट अनेकांना कळून आले की या वास्तूत एक थोर आत्मज्ञानी संत अनेक दशके वास करून होता. ही परिस्थिती जशी खेतवाडीच्या एका गल्लीतील होती, तशीच परिस्थिती थोड्याफार फरकाने अख्या महाराष्ट्रातील जनतेची होती.

दक्षिण मुंबई भागातील वाळकेश्वर इथले बाणगंगा हे एक पवित्र स्थान मानले जाते. श्री निसर्गदत्त महाराजांचे सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज यांचे १९३६ साली मुंबईत महानिर्वाण झाले. बाणगंगा परिसरातील दहनभूमीत त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. पुढे १९५० साली त्या स्थळावर मुंबईस्थित सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या शिष्यमंडळींनी संगमरवरी समाधी उभी केली. श्री निसर्गदत्त महाराजांच्या महानिर्वाणानंतर तत्कालीन अध्यात्म केंद्र पदाधिका-यांनीही त्या स्थळी महाराजांची समाधी स्थापना करण्याचे प्रयत्न केले, पण काही न काही कारणाने त्या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही. मधल्या ४० वर्षांच्या दीर्घ काळात बाणगंगा समाधी स्थळी सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे मुंबईस्थित शिष्य सद्गुरू श्री काडसिद्धेश्वर स्वामी, सद्गुरू श्री रणजीत महाराज यांचे महानिर्वाण आणि त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांचीही समाधी मंदिरे तिथे स्थापन झाली. या पार्श्वभूमीवर सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराज यांचे समाधी मंदिर मात्र अद्याप उभे राहू शकत नाही याची खंत आणि हुरुहूर अनेक गुरुबंधू आणि भगिनी यांच्या मनात होती. त्यासाठीचे सतत प्रयत्न चालू होते, पण आपल्या हयातीत हे स्वप्न पुरे होईल का ? ही पण साशंकता होती. शेवटी सद्गुरुंच्याच आशीर्वादाने दोन वर्षापुर्वी म्हणजे जानेवारी २०२२ रोजी ते स्वप्न पूर्ण झाले. अर्थात त्यावेळी मुख्य अडचण होती ती म्हणजे नियोजित समाधी स्मारकात जतन करून ठेवण्यासाठी महाराजांच्या एवढ्या वर्षापूर्वीच्या अस्थी कश्या मिळवायच्या. पण महाराजांनी ती अडचणही सहज सोडवली. गुरुबंधू सर्वश्री सुजाण शेटे, अनिल चुबे, दिनकर क्षीरसागर, रामनाथ घुगे, प्रकाश मुडये आदी शिष्यमंडळी तसेच गुरुभगिनी कमलाबेन लुंड, सुजाता चव्हाण, ललिता बेलवलकर, महाराजांची नात सविता, वनजाताई आदींनी अनेक वर्षे आपल्या घरात दैनंदिन पूजेसाठी जीवापाड जपून ठेवलेले अस्थिकलश या पवित्र कामासाठी आनंदाने सुपूर्द केले. हिंचगिरी संप्रदायाचे आद्य सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीच्या पुण्य पावन दिवशी मोठ्या उत्साहात सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराजांचे संगमरवरी सुबक समाधी मंदिर बाणगंगा समाधी स्थळी उभे राहिले. श्री निसर्गदत्त महाराज आणि श्री भाईनाथ महाराज हे दोघे गुरुबंधू. दैनंदिन भजनात शेवटी जो नामघोष जयजयकार केला जातो त्यात आपल्या नावानंतर भाईजींच्या नावाने पण जयजयकार करावा अशी सूचना सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराजांनी शिष्यमंडळीना केली होती. त्यानुसार आजही शिष्यमंडळी त्याचे पालन करतात. त्यामुळेच श्री निसर्गदत्त महाराजांच्या समाधी मंदिर उभारणीवेळी श्री महाराजांचे प्रिय गुरुबंधू सद्गुरू श्री भाईनाथ महाराज यांचेही छोटेखानी स्मारक उभारले गेले आणि श्री भाईनाथ महाराजांच्या समाधी मंदिराचेही त्याच शुभदिनी भक्तार्पण करण्यात आले. अशा रीतीने एक मोठा दुर्मिळ योग त्या दिवशी जुळून आला तो म्हणजे सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज आणि त्यांचे मुंबईस्थित शिष्य यांची समाधि मंदिरे एकाच स्थळी आता अस्तित्वात आली आहेत. शिष्य परिवार, भक्तजन, भाविक आणि पुढील येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी हे एक पवित्र तीर्थक्षेत्र बाणगंगा इथे निर्माण झाले आहे.
भविष्यकालीन समाधी व्यवस्थापन ही काळाची गरज लक्षात घेऊन श्री निसर्गदत्त समाधी चॅरीटेबल ट्रस्ट स्थापन झाला आहे. त्या माध्यमातून हे सांप्रदायिक काम पुढे नेण्याचा विश्वस्तांचा मनोदय आहे. त्यासाठी या ट्रस्टचे जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी सभासदत्व घ्यावे असे या निमित्ताने सर्वाना आवाहन करत आहोत. धन्यवाद !!
- सौ अनघा धोत्रे-कामत
अध्यक्षा , श्री निसर्गदत्त समाधी चॅरिटेबल ट्रस्ट