अनादि काळापासून भारतवर्षात अध्यात्माची अखंड ज्ञानगंगा वेद-उपनिषदांच्या माध्यमातून आणि तत्त्वदर्शी ऋषींच्या स्वानुभवातून अविरत प्रवाहित होत आहे. युगानुयुगे विविध शास्त्रोक्त संप्रदाय आणि दिव्य गुरुपरंपरेच्या माध्यमातून अंतिम सत्याचे चिंतन व अनुसंधान अखंड सुरू आहे. अशाच इंचेगिरी संप्रदायातील महान गुरुपरंपरेमध्ये श्री निसर्गदत्त महाराज हे एक थोर आत्मज्ञानी महापुरुष होते.
फेब्रुवारी २०२२ मध्ये, श्री निसर्गदत्त महाराजांची समाधी त्यांच्या सद्गुरु श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या सान्निध्यात मुंबईतील वाळकेश्वर, बाणगंगा येथे प्रतिष्ठापित करण्यात आली.
श्री निसर्गदत्त महाराजांची शिकवण "I Am That", हा जणू आधुनिक उपनिषदच, या ग्रंथाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात पसरली आहे. विविध भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथाने आत्मज्ञानाच्या शोधकांना अमूल्य मार्गदर्शन केले आहे.
श्री निसर्गदत्त महाराजांची वाणी, त्यांच्या अप्रकाशित ग्रंथसंपदा आणि निरूपणे, तसेच इंचेगिरी संप्रदायातील इतर महापुरुषांची शिकवण, उपनिषदे आणि वेदांत तत्त्वज्ञान हे सर्व इच्छुक साधकांपर्यंत पोहोचावे, या पवित्र उद्देशाने "श्री निसर्गदत्त समाधी चॅरिटेबल ट्रस्ट" तर्फे "निसर्गवाणी" या नावाने एक ऑनलाइन त्रैमासिक सुरू करण्यात येत आहे.
या संप्रदायात अनेक कन्नड भाषिक संत असल्याने, त्यांच्या शिकवणी मराठी लोकांपर्यंत पोहोचाव्यात, तसेच व्यापक स्तरावर साधकांना लाभदायक व्हाव्यात, यासाठी हे त्रैमासिक मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये प्रकाशित केले जाणार आहे. कार्याचा पवित्र उद्देश लक्षात घेऊन, हे त्रैमासिक पूर्णतः विनामूल्य राहील आणि यासाठी कोणत्याही देणगीची आवश्यकता नाही, हे सांगणे महत्त्वाचे वाटते.
जय सद्गुरु!
| मासिकाचा महिना | मराठी | हिन्दी | इंग्रजी | कन्नड |
| जुलै २५ ते सप्टेंबर २५ | मॅगझीन बघा | मॅगझीन बघा | मॅगझीन बघा | मॅगझीन बघा |
| ऑक्टोबर २५ ते डिसेंबर २५ | मॅगझीन बघा | मॅगझीन बघा | मॅगझीन बघा | मॅगझीन बघा |
| जानेवारी २६ ते मार्च २६ | मॅगझीन बघा | मॅगझीन बघा | मॅगझीन बघा | मॅगझीन बघा |